Wednesday, June 30, 2010

SOIL TESTING-माती परीक्षण - का व कशासाठी-


माती परीक्षण - का व कशासाठी
शेतातील मातीच्या नमुन्याचे भौतिक , रासायनिक व जैविक पृथक्करण करून त्यातील अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासणे यास माती परीक्षण म्हणतात.
महत्त्व
१- उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण समजते
२-जमिनीमधील दोष समजतात
३-जमिनीच्या प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते.
४-जमीन सुधारण्यासाठी नियोजनबध्द उपाययोजना करता येते.
५-आवश्यक तेवढेच खत व संतुलित खतांचा पुरवठा झाल्यामुळे आर्थिक बचत व उत्पादनक्षमता टिकून राहते.
मातीचा नमुना घेण्याची पद्धत
शेतातील नमुना योग्य पद्धतीने घेणे हि माती परीक्षण कार्यक्रमात सर्वात महत्त्वाची बाब आहे. वर्षभरात नमुने कधीही काढता येतात.तथापि , पाऊस झाल्यावर , पाणी दिल्यानंतर , वाफसा नसतांना आणि खते घातल्यानंतर लगेच नमुने काढू नयेत. जमिनीत पिक घेण्याच्या हंगामापूर्वी नमुने घेणे अधिक योग्य आहे.
१-जमिनीचा रंग, चढ उतार , खोली , खडकाळ किंवा खोलगटपणा, पाणथळ , निचऱ्याची परिस्थिती अशा भागाचा विचार करून शेताचे निरनिराळे विभाग पडावेत. अशा प्रकारे शेतातील निरनिराळ्या ठिकाणचे नमुने घेऊन त्यापासून प्रातिनिधिक नमुना तयार करावा. प्रत्येक विभागातून १० ते १२ ठिकाणच्या मातीचे नमुने घेऊन ते घमेल्यात किंवा पोते यावर घ्यावे. त्याचे चार समान भाग करून समोरासमोरचे दोन भाग घ्यावेत. अशा प्रकारे अर्धा किलो माती होईपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी.
२-केळी, द्राक्षे, डाळिंब, उस, कापूस - २० ते २५ से मी खोलीपर्यंत नमुना घ्यावा.
३-भाजीपाला , तेलवर्गीय पिके - १० ते १५ से मी खोलीपर्यंत नमुना घ्यावा.
४-फळ बागायती पिके- १०० से मी खोलीपर्यंत नमुना घ्यावा.
मातीचा नमुना काढतांना घ्यावयाची काळजी
१-शेतात जनावरे बसण्याची जागा , खत, कचरा टाकण्याच्या जागा , विहिरीचे आणि शेताचे बांध या जागेतून मातीचे नमुने घेऊ नये.
२-शेतात रासायनिक खते टाकली असल्यास २ ते अडीच महिन्यांच्या आत नमुना घेऊ नये
३- निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीचे किंवा निरनिराळ्या शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळू नये.
४-झाडाखालील , पाणथळ जागेतील व माती वाहुन गेलेल्या जागेतील मातीचा नमुना घेऊ नये.
५-ठिबक सिंचन असल्यास वेटिंग बोलच्या कडेचा नमुना घ्यावा
६-रासायनिक खताच्या रिकाम्या केलेल्या पिशव्या मातीचा नमुना घेण्यासाठी वापरू नयेत.
मातीच्या नमुन्याबरोबर खालील माहिती पाठवावी.
१- शेतकऱ्याचे नाव व पत्ता
२-नमुना घेतल्याची तारीख व नमुना घेतलेल्या जमिनीची खोली
३-गट नं , सर्वे नं व एकूण क्षेत्र
४-जमिनीचा प्रकार व खोली
५-पाण्याचा स्रोत व जमिनीचा निचरा
६- सिंचन पद्धती
७- मागील हंगामात घेतलेले पिक व पुढील हंगामात घेण्याचे पिक व जात
८- पिक लागवडीमध्ये आलेल्या विशिष्ट अडचणी

No comments:

Featured Post

कांदा- खत व्यवस्थापन

खत व्यवस्थापन कांदा पिकाला नत्र खताचा वापर माफक प्रमाणात करावा. सल्फर [गंधक ] जरूर वापरावे त्यामुळे कांदा साठवणीसाठी चांगला टिकतो. हलक्या जम...